“१५ ऑगस्टपर्यंत करोनावर लस? शक्यच नाही”
“१५ ऑगस्टपर्यंत करोनावर लस? शक्यच नाही”
ICMRच्या दाव्यावर तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह

संग्रहित छायाचित्र
करोनाच्या संकटामुळे चिंतेत असलेल्या देशवासीयांना गुरूवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) दिलासादायक बातमी दिली. भारत बायोटेक आणि आयसीएम यांनी करोनावर प्रभावी ठरू शकणारी कोव्हॅक्सीन ही लस शोधली आहे. ही लस १५ ऑगस्टपर्यंत बाजारात आणणार असल्याचा विश्वास आयसीएमआरनं व्यक्त केला. मात्र, आयसीएमआरनं केलेला दावा अवास्तविक असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन बाजारात आणण हे शक्य नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस’नं वृत्त दिलं आहे.
सध्या देशात करोना रुग्णांच्या आकडेवारीत दररोज उच्चांकी संख्येनं भर पडत आहे. दुसरीकडे अजूनही करोनावर पूर्णपणे प्रभावी ठरणारे औषध वा लस तयार करण्यात आलेली नाही. भारत बायोटेक व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोव्हॅक्सीन ही लस तयार केली असून, त्याच्या रुग्णांवरील चाचण्या अजून बाकी आहेत. मात्र, ही लस औषध १५ ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध करू देऊ, असं आयसीएमआरनं एका पत्रातून म्हटलं होतं.
आयसीएमआरनं केलेल्या दाव्यावर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रोगप्रतिकार तज्ज्ञ विनिता बाळ म्हणाल्या,”अद्याप चाचण्या सुरू असलेली लस इतक्या लवकर तयार कशी होणार हेच समजत नाहीये. १५ ऑगस्टपर्यंत लस तयार होणार हे उद्दिष्ट पूर्णपणे अवास्तविक आहे. कोणतीही लस इतक्या वेगात तयार केली जात नाही. त्यात बऱ्याच प्रक्रिया आहेत. आपण चांगल्या स्थितीत असतानाही संकटकालीन स्थितीत असल्याचं समजून १५ ऑगस्टपर्यंतच कालमर्यादा ठरवणं, हे अशक्य नसलं तरी अवास्तविक आहे,” असं बाळ म्हणाल्या.
“जी लस तयार करण्यासाठी अजूनही प्री क्लिनिकल डेव्हलपमेंट चालू आहे, अशा स्थितीत आयसीएमआरच्या पत्रातील दाव्यानुसार ७ जुलैपासून क्लिनिकल चाचणी कशी सुरू केली जाऊ शकते? आणि लस १५ ऑगस्टपर्यंत कशी उपलब्ध होऊ शकते? व्हॅक्सिनची चाचणी एका महिन्यापेक्षा कमी वेळात पूर्ण झाली, म्हणजे त्या व्हॅक्सिनची कार्यक्षमता (किंवा किती गुणकारी आहे) हे आधीच ठरवलं होतं का?,” असं अनंत भान यांनी म्हटलं आहे.
Comments
Post a Comment