धोक्याची घंटा : दिल्ली-एनसीआरला पुन्हा भूकंपाचा धक्का



धोक्याची घंटा : दिल्ली-एनसीआरला पुन्हा भूकंपाचा धक्का

भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या भागांना शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजल्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 'नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी'च्या रिपोर्टनुसार, गुरुग्राम-हरियाणाच्या दक्षिण-पश्चिम भागात ६३ किलोमीटरच्या अंतरावर या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल मोजण्यात आली. तर राजस्थानात मात्र या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल मोजण्यात आली. दरम्यान, या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही जीवितहानी किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून दिल्ली - एनसीआरसहीत देशातील उत्तर भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.दिल्ली - एनसीआर या भागांसहीत हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांनाही हा भूकंपाचा धक्का जाणवला. भीतीमुळे घाबरलेले अनेक लोक जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले.

भूकंपाच्या धक्क्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. 'काही वेळापूर्वी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. तुम्ही सर्व सुरक्षित असाल अशी आशा, स्वत:ची काळजी घ्या' असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं.

आजच (शुक्रवारी) मिझोरम राज्यातही दुपारी १४.३४ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ४.६ होती. या भूकंपातही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. गोल्या दोन आठवड्यांपासून मिझोरममध्येही अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

यापूर्वी गुरुवारी जम्मू - काश्मीर भागात सलग काही वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रताही ४.५ रिश्टर स्केल मोजण्यात आली होती. याशिवाय जम्मू काश्मीरच्या कटरा भागातही ३.६ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

धोक्याची घंटा

हे भूकंपाचे धक्के अधिक तीव्र नसले तरी भूकंपावर संशोधन करणारे तज्ज्ञ मात्र याला धोक्याची घंटा समजत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिमालयाच्या जवळपास धरतीच्या खाली खूप बदल होत आहेत. त्यामुळे हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तज्ज्ञांकडून मोठ्या भूकंपाची चेतावणीही देण्यात आली आहे. देहरादूच्या वाडिया इन्स्टिट्युट ऑफ हिमालयन जिओलॉजीचे संचालक डॉ. सेन यांच्या म्हणण्यानुसार, इंडियन प्लेटच्या अंतर्भागात असणाऱ्या दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाला मोठा इतिहास आहे. सध्या, भूकंपाची वेळ, जागा आणि तीव्रतेचा स्पष्टपणे अंदाजा लावता येत नस्ल तरी एनसीआर क्षेत्रात जाणवणारे भूकंपाचे धक्के धोक्याची सूचना देत आहेत. या स्थितीमुळे राजधानी दिल्लीला एखादा मोठा भूकंपाचा धक्काही बसू शकतो.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब