पबजी खेळाच्या वेडापायी एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या
पबजी खेळाच्या वेडापायी एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर: पबजी (PUBG) मोबाइल गेमच्या वेडापायी अनेक मुलांनी जीव गमावला आहे. नागपुरातही पबजी गेम खेळण्याच्या वेडातून नैराश्येत गेलेल्या १९ वर्षीय तरुणानं पंख्याला बांधलेल्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जुना फुटाळ्यातील कॉर्पोरेशन कॉलनी येथे बुधवारी घडली. ऋतिक किशोर ढेंगे असे मृताचे नाव आहे. तो पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला होता.करोनामुळे ऋतिक नागपुरात परतला. तो खोलीत तासनतास मोबाइलवर पबजी खेळायचा. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. नातेवाइकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारानंतर तो घरी परतला. मात्र, त्यानंतरही तो पब्जी खेळण्यात गुंग राहायचा. याचदरम्यान तो नैराश्येत गेला. तणावात राहायला लागला. त्याच्यातील बदल कुटुंबीयांनाही जाणवला. ऋतिक याच्या वडिलांनी त्याला अनेकदा समजावले. परंतु त्याचे पब्जीचे वेड गेले नाही.
बुधवारी त्याने कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर तो खोलीत गेला. मोबाइलवर पब्जी खेळला. याचदरम्यान त्याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. ऋतिक बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने घरातील इतर सदस्यांना संशय आला. त्याची आई खोलीत गेली. ऋतिक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ते दृश्य पाहताच आईने हंबरडा फोडला. अन्य नातेवाइकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. गळ्यातील दोरीचा फास काढून ऋतिकला खाली उतरवले. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ऋतिक याचे वडील शिक्षक असून, आई गृहिणी आहे. ऋतिक याला भाऊ आहे. ऋतिकच्या मृत्यूने ढेंगे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऋतिकच्या आत्महत्येप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, पबजीच्या वेडापायी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील एका आदिवासी विद्यार्थ्यानंही काही महिन्यांपूर्वी पबजीच्या वेडापायी आत्महत्या केली होती. वडिलांनी त्याला पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. हेमंत झाटे (वय १९) असं त्या विद्यार्थ्याचं नाव होतं. पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंतला पबजी गेमचं व्यसन जडलं होतं. रात्री उशिरापर्यंत तो मोबाइलवर पबजी खेळत असे. त्याच्या वडिलांनी हेमंतला अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. पबजी खेळू नको असं सांगितलं होतं. त्यानंतर तो त्याच्या खोलीमध्ये लवकर झोपण्यासाठी गेला. मात्र, त्यानं खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
Comments
Post a Comment