सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी
सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी
महापालिका गटनेते आणि अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती
सोलापूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सोलापूर शहर आणि नजिकच्या तालुक्यातील काही गावांत पुर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) करण्यात येणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल लॉकडाऊन बाबत अधिकाऱ्यांनी एकत्रित बसुन निर्णय घ्यावा त्या बाबतच्या कालावधी, नियमावली ठरवावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिकेचे गटनेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी कालच्या बैठकीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात लॉकडाऊन लागू करावा, असे सुचविले होते. त्यानुसार आज या बाबत व्यापक चर्चा झाली. चर्चाअंती 16 जुलै ते 26 जुलै सोलापूर शहर आणि नजिकच्या तालुक्यातील काही गावात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले की, पुर्वीप्रमाणेच 16 ते 26 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी आवश्यक वस्तू येत्या तीन चार दिवसात खरेदी करुन ठेवाव्यात. लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी सांगितले की, लॉकडाऊन कालावधीत कोणत्या सेवांना सवलत दिली जाईल, याबाबतचे सविस्तर आदेश उद्या जाहिर केले जातील. लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेकडून रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असणारे किट येत्या तीन चार दिवसात प्राप्त होतील. नागरिकांनी या टेस्ट करुन घेण्यासाठी सहकार्य करावे. तत्पुर्वी, जिल्हाधिकारी शंभरकर यांनी महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे,सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे,गटनेते आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, किसन जाधव, रियाज खैरादी, यांच्याशी चर्चा केली.
त्याअगोदर शंभरकर यांनी मनपा आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त अजयसिंह पवार, पंकज जावळे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, बापू बांगर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे आदि उपस्थित होते.
Comments
Post a Comment