सुर्यग्रहणाचा गरोदर स्त्रियांवर खरंच परिणाम होतो का?
सुर्यग्रहणाचा गरोदर स्त्रियांवर खरंच परिणाम होतो का?

सूर्यग्रहण म्हणजे निसर्गाचा आणि सृष्टीचा दुर्मिळ पण लक्षणीय असा सोहळा! २०२० या वर्षात दोनदा ग्रहण झाले असून आता २१ जून ला दिसणार आहे ते तिसरं ग्रहण आहे सूर्यग्रहण! या सूर्यग्रहणाची खास गोष्ट म्हणजे भारतात दिसणारं हे एकमेव सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असून २१ जून रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटे आणि ५८ सेकंदांनी सुरु होईल आणि दुपारी ३ वाजून ४ मिनिटे आणि १ सेकंदाने संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण एकूण ५ तास ४८ मिनिटे आणि ३ सेकंद दिसेल. तर सूर्यग्रहण हि एक नैसर्गिक घटना असली तरी बरेच जण असे मानतात की याचा मानवी जीवनाशी सबंध आहे आणि सूर्यग्रहणामुळे मानवी आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. खास करून गरोदर स्त्रीवर! म्हणून आज आम्ही या लेखातून घेऊन आलो आहोत काही गोष्टी ज्या गरोदर स्त्रीने सूर्यग्रहणा दरम्यान पाळाव्यात असे मानले जाते.
गरोदर स्त्रिया आणि सूर्यग्रहण
सूर्यग्रहणाच्या वेळेस गरोदर स्त्रीने खूप काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. या काळात त्यांच्यावर अनेक बंधने घातली जातात ज्याचा उद्देश असतो त्यांची आणि बाळाची सुरक्षा! हे असं का? तर असं म्हणतात की सूर्यग्रहणात गरोदर स्त्री बाहेर पडली किंवा त्याचा प्रभाव तिच्या शरीरावर पडला तर तिच्यासोबत बाळावर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून गरोदर स्त्रीला सूर्यग्रहणात घरा बाहेर पडू नये असा दिला जातो. याशिवाय सुद्धा काही गोष्टी आहेत ज्यांची गरोदर स्त्रीने काळजी घ्यावी असे म्हटले जाते.
विज्ञान काय म्हणतं?
वैज्ञानिक दृष्ट्या मात्र असा काही थेट परिणाम होतो ही गोष्ट अमान्य केली जाते. विज्ञानाच्या म्हणण्यानुसार सूर्यग्रहण आणि गरोदर स्त्रीवर होणारे दुष्परिणाम यांचा काही सबंध नाही. सुर्यग्रहणात काही दुष्परिणाम झाले तर त्या मागे इतरही कारणे असू शकतात. परंतु धार्मिक दृष्ट्या असं म्हटलं जातं की या काळात गरोदर स्त्रीने योग्य काळजी घ्यावी. उगाच विषाची परीक्षा घेऊ नये. शेवटी स्त्री सुद्धा आपल्या बाळाच्या भल्याचा विचार करून त्याच्या प्रेमापोटी धोका पत्करत नाही आणि सूर्यग्रहण घरी राहून पाळते.
ग्रहण काळात घराबाहेर गेलो तर?
ज्योतिषी आणि धार्मिक प्रथांनुसार सूर्यग्रहण सुरु असताना गरोदर स्त्रीने घराबाहेर निघणे धोक्याचे ठरू शकते. याला वैज्ञानिक पुष्टता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले. पण कोणतीही आपत्कालीन स्थिती असले तर मात्र योग्य काळजी बाळगून नक्कीच घराबाहेर जा. जसे की बाळाला उपचार हवे असतील किंवा गरोदर स्त्रीला काही शारीरिक त्रास होत असेल तर तिने अवश्य अशा काळातही डॉक्टरांची भेट जरूर घ्यावी. मात्र कारण नसताना घराबाहेर न पडलेले उत्तम!
सूर्यग्रहणात काय खबरदारी घ्यावी?
सूर्यग्रहण हे संपूर्ण भारतभर पाळले जाते. जुन्या जाणत्या लोकांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या गरोदर स्त्रीने करू नये असे म्हणतात. त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. गरोदर स्त्रीने घराच्या आतच राहावे आणि आराम करावा. ग्रहण काळात जास्त मेहनतीचे काम करू नये. धारदार गोष्टींचा वापर करू नये. अशा काही गोष्टी आहेत ज्याची गरोदर स्त्रीने काळजी घ्यावी आणि या गोष्टी करू नये असे म्हटले जाते.
ग्रहणात काहीच खाऊ नये का?
अजून एक बंधन गरोदर स्त्रीवर टाकलं जातं ते म्हणजे गरोदर स्त्रीने या काळात काही खाऊ नये. या गोष्टीला सुद्धा विज्ञान मानत नाही, पण आहार संतुलितच घ्यावा असं विज्ञान सुद्धा सांगतं. धार्मिक मान्यतेनुसार मात्र ग्रहणात गरोदर स्त्रीला काहीच खाण्या-पिण्याची मुभा नसते. पण असे करणे धोकादायक ठरू शकते. कारण या काळात गरोदर स्त्रीला आणि बाळाला सुद्धा शारीरिक उर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे सुरक्षितता म्हणून ग्रहण सुरु होण्याआधी मुबलक प्रमाणात आहार घ्यावा आणि ग्रहण काळात काही खाल्ले नाही तरी चालेल. अखेर एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती म्हणजे शेवटी हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग आहे. त्यामुळे ग्रहण पाळावे वा न पाळावे हा गरोदर स्त्रीचा कौल आहे पण तिने आपल्या व बाळाच्या काळजीत अजिबात हयगय करू नये!
Comments
Post a Comment