यंदा पंढरीच्या वाटेवर असणार तिहेरी पोलीस बंदोबस्त


यंदा पंढरीच्या वाटेवर असणार तिहेरी पोलीस बंदोबस्त

सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली माहिती


संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पंढरपुरातील आषाढी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. पायी दिंडी सोहळा न करता मानाच्या सात पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नियोजन केले असून, तिहेरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. तसेच, इतर भाविकांनी पंढरीत न येता आपल्या घरीच रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आषाढी एकादशी १ जुलै रोजी आहे. उन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पायी पंढरीची वारी करण्याची  परंपरा वारकरी संप्रदायात आहे. मात्र यंदा करोना महामारीचे संकट देशावर घोंगावत आहे. त्यामुळे यंदा आषाढी वारी होणार का ? याची सर्वांना उत्सुक्ता होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेवून वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळी यांच्याशी चर्चा केली. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत एकनाथ आणि जगदगुरू तुकोबाराय या सात पालख्यांना पायी न जाता आपली परंपरा जपण्याची परवानगी दिली. या सात मानाच्या पालख्यांबरोबर मोजकेच भाविक पंढरीला येणार आहेत. या खेरीज अन्य भाविकांनी आपल्या घरी रहावे, असा निर्णय झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. याचा एक भाग म्हणून पोलीस विभाग पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व ठिकाणी नाकाबंदी करणार आहे. यात जिल्हा, तालुका या ठिकाणी  नाकाबंदी आहेच. मात्र आता शहरात देखील नाकाबंदी केली जाणार आहे. अशा प्रकारे तिहेरी पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे यंदाची आषाढी वारी मर्यादित भाविकांबरोबर पण परंपरा जोपासत आणि आरोग्यमय होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब