न्यायालयाचे कामकाज उद्यापासून फक्त सकाळच्या सत्रात


न्यायालयाचे कामकाज उद्यापासून फक्त सकाळच्या सत्रात

फक्त तातडीच्या प्रकरणांवर कामकाज



पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज शुक्रवारपासून (१९ जून) सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कार्यप्रणालीत काही दुरुस्ती केली आहे. त्यानुसार सत्र न्यायालयातील कामकाज फक्त सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील न्यायालयांचे कामकाज सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये सुरु ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज ८ जूनपासून नियमित सुरू करण्यात आले होते. मात्र, शहरातील करोनाचा संसर्ग विचारात घेता न्यायालयीन कामकाज सकाळच्या सत्रात सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी ठेवण्यात येणार असली तरी सर्व प्रकारचे दावे दाखल करण्यास मुभा देण्यात आली आहे. शुक्रवारपासून न्यायालयाचे कामकाज सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पुणे बार असोसिशएनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक, उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, अ‍ॅड. योगेश तुपे यांनी दिली.

न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार असून पक्षकारांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन पुणे बार असोसिशनकडून करण्यात आले आहे. न्यायालयात होणारी गर्दी आणि संसर्गाला अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. न्यायालयीन आवारात फक्त महत्त्वाच्या कामकाजासाठी येणारे पक्षकार आणि वकिलांची तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. जंतुनाशकाचा वापर करण्यात येत आहे.मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब