चिंताजनक! सोलापुरात २४ तासांत करोनाचे १३ बळी; नवे ८८ रूग्ण सापडले
चिंताजनक! सोलापुरात २४ तासांत करोनाचे १३ बळी; नवे ८८ रूग्ण सापडले

करोनामुक्त झालेल्या रूग्णांचे प्रमाणही आता ५१.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
सोलापुर : सोलापुरात दिवसेंदिवस करोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे १३ बळी गेले असून नवीन ८८ रूग्णांची भर पडली आहे. सर्व १३ मृतांसह एकूण ८८ रूग्णांपैकी ८१ रूग्ण शहरातील आहेत. दुसरीकडे करोनामुक्त झालेल्या रूग्णांचे प्रमाणही आता ५१.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
आतापर्यंत सोलापूर शहरातील रूग्णसंख्या ११८८ तर ग्रामीण भागातील रूग्णसंख्या ८० झाली आहे. अवघ्या ५६ दिवसांत रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच मृतांच्या संख्येतही होणारी वाढ चिंताजनक बनली आहे.
सोलापुरात करोनाचा पहिला रूग्ण १२ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर आता शहराच्या उर्वरीत भागातही करोनाने चांगलाच शिरकाव केला आहे. अलिकडे टाळेबंदी टप्प्या-टप्प्याने बऱ्यापैकी शिथील झाल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे दिसून येते.
दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, माढा, माळशिरस, सांगोला आदी नऊ तालुक्यांत करोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. कुर्डूवाडी येथे रेल्वे सुरक्षाबलाच्या सहा जवानांना करोनाने बाधित केल्याने रेल्वे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तर जिल्हा कारागृहातील करोनाबाधित रूग्णसंख्याही सहाने वाढून ८४ पर्यंत पोहोचली आहे.
😔
ReplyDelete