गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धांना दिली मूठमाती!


गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धांना दिली मूठमाती!

समृद्धी जाधव

कोल्हापूर:ग्रहण काळात वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा अंधश्रद्धांचीच अधिक चर्चा होते. विशेषतः गर्भवती महिलांवर अनेक निर्बंध घातले जातात. इस्लामपुरातील (जि. सांगली) समृद्धी चंदन जाधव या गर्भवतीने मात्र ग्रहण काळात पाळल्या जाणाऱ्या सर्व प्रथा आणि अंधश्रद्धांना मूठमाती दिली. महाराष्ट्र अंनिसने याबाबत पुढाकार घेऊन ग्रहणाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी उपक्रम आयोजित केला होता.इस्लामपुरातील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला समृद्धी जाधव यांनी रविवारी पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे, पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण पाहण्याचाही आनंद घेतला. समृद्धी या बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी चंदन जाधव या युवकाशी आंतरजातीय विवाह केला आहे. समृद्धी यांच्या सासू सिंधुताई जाधव आणि कुटुंबीयांनी त्यांना अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गर्भवती महिलांनी ग्रहण पाळणे ही अंधश्रद्धा असल्याचा संदेश सर्वांना देण्यासाठी जाधव कुटुंबीयांनी महाराष्ट्र ' अंधश्रद्धा निर्मूलन समिती 'च्या पुढाकारातून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. घराच्या अंगणात ग्रहण काळात फळे, अन्न सेवन करण्यासह उपस्थितांचे प्रबोधनही करण्यात आले.यावेळी बोलताना समृद्धी जाधव म्हणाल्या, 'आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझी व माझ्या कुटुंबाची जागृती केली. आम्ही हे धाडसी पाऊल टाकले आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला साथ दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद होत आहे.' यावेळी प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, अरविंद कांबळे, प्रा. राजा माळगी, विनोद मोहिते, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, संपत शिंदे, आदी उपस्थित होते.दरम्यान, ग्रहण काळात कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठासह विवेकानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक, खगोल अभ्यासकांनी ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. अंबाबाई मंदिरात ग्रहण काळात श्रीपूजकांनी पूजाअर्चा करीत उत्सवमूर्तीस अभिषेक घातला.

Comments

  1. खूप छान उपक्रम आहे याच्यातून नक्कीच जनजागृती होईल

    ReplyDelete

Post a Comment


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब