करोनाबाधित २ रुग्ण घरातून पळाले
करोनाबाधित २ रुग्ण घरातून पळाले
सध्या पोलीस या महिलेचा तपास करत आहेत.

संग्रहित छायाचित्र
विरार : वसई-विरारमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना तुळींज आणि वालीव परिसरातून घरीच अलगीकरणात असलेले २ करोनाबाधित रुग्ण पळाले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना ही तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे. नालासोपारा गाला नगर परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेस करोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर तिची खाजगी रुग्णालयात कोविड चाचणी केली. ती करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी महापालिका आरोग्य विभागाचे पथक तिच्या घरी गेले असता ही महिला घरातून पळून गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी आरोग्य विभागाने तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या महिलेचा तपास करत आहेत. या महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसून ती या अगोदर अनेक वेळा घर सोडून गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दुसरी घटना ही वसई पूर्वेच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे. वाकणपाडा परिसरातील एक इसम करोनाबाधित झाल्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले होते. यातील एक २४ वर्षीय युवक हा महापालिका आरोग्य कर्मचारी तपसणीसाठी गेले असता घरातून निघून गेला असल्याचे समजले. तसेच अलगीकरणात असतनाही सदर इसम हा नियमांचे उल्लंघन करून बाहेर फिरत असल्याचे समजले म्हणून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Post a Comment