पेट्रोलियम कंपन्यांचं ठरलं; पुढील आठवड्यात ग्राहकांना दे धक्का!
पेट्रोलियम कंपन्यांचं ठरलं; पुढील आठवड्यात ग्राहकांना दे धक्का!

पेट्रोल पंप
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या महिनाभरात ५० टक्के वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल ३० डॉलरच्या पुढे आहेत. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. त्यातच सरकारने उत्पादन शुल्क वाढवल्याने त्याचा भारही कंपन्या सहन करत आहेत. कंपन्यांचा खर्च आणि विक्री यातील तफावत प्रती लीटर ४ ते ५ रुपयांपर्यंत वाढली आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी कंपन्यांकडून दररोज २० ते ४० पैसे प्रती लीटर दरवाढ केली जाईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली आहे. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. कंपन्यांनी दररोज पेट्रोल दरांचा आढावा घेणे थांबवले होते. मात्र आता त्या सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने परवानगी दिली की जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींशी संलग्न दर देशात पुन्हा एक दररोज अंमलात येतील.
दरम्यान, इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार मुंबईत गुरुवारी पेट्रोलचा भाव ७६.३१ रुपये आणि डिझेलचा भाव ६६. २१ रुपयांवर कायम आहे. आज त्यात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७१.२६ रुपये आहे. डिझेलच्या दरात देखील कोणताही बदल झालेला नाही. डिझेलचा भाव ६९.३९ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोल दर ७५.५४ रुपये असून डिझेल ६८.२८ रुपये आहे. हैदराबादमध्ये पेट्रोल दर प्रती लीटर ७३.९७ रुपये असून डिझेल ६७.२८ रुपये आहे.
देशातील पेट्रोल डिझेलचे भाव जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्या इंधन दर निश्चित करत असतात. यापूर्वी ५ मे रोजी काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात बदल झाला होता.
Comments
Post a Comment