चीनने अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळलं, सांगितलं घरी करोना व्हायरसवर द्या लक्ष
चीनने अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळलं, सांगितलं घरी करोना व्हायरसवर द्या लक्ष
दक्षिण चीनच्या समुद्रात अमेरिका आणि चीनमधील संघर्ष वाढत चालला आहे.

दक्षिण चीनच्या समुद्रात अमेरिका आणि चीनमधील संघर्ष वाढत चालला आहे. घुसखोरी करणाऱ्या अमेरिकन युद्धनौकेला बाहेर पिटाळून लावल्याचा दावा चीनने केला आहे. दक्षिण चीन सागरात मंगळवारी आमच्या नियंत्रणाखाली असलेल्या बेटाजवळ आलेल्या अमेरिकन युद्धनौकेला शोधून बाहेर काढण्यासाठी विमाने आणि जहाजे पाठवण्यात आली होती असे पीपल्स लिबरेशन ऑफ आर्मीकडून सांगण्यात आले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
‘यूएसएस बॅरी’ ही गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर चिथावणीखोर कृती करुन, आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत होती. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या या युद्धनौकाला बाहेर काढण्यासाठी आम्हाला कारवाई करावी लागली असे पीएलएच्या दक्षिण कमांडने म्हटले आहे. पॅरासेल बेटाजवळ ही घटना घडली. चीनमध्ये हे शिशा बेट म्हणूनही ओळखले जाते. दक्षिण चीन समुद्रातील ३० पेक्षा जास्त बेटांवर चीनचे नियंत्रण आहे. पण तैवान आणि व्हिएतनामचा सुद्धा या बेटांवर दावा आहे.
चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला मालकी हक्क सांगत आहे. पण फिलीपाइन्स, ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि तैवान हे देश चीनच्या विरोधात आहेत. “अमेरिकेची चिथावणीखोर कृती हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांचे उल्लंघन आहे. यामुळे चीनच्या सार्वभौमत्वाबरोबर सुरक्षा हिताला धोका निर्माण झाला” असे ली ह्युआमिन यांनी म्हटले आहे. ली कमांडचे प्रवक्ते आहेत. “अमेरिकेच्या आपल्या घरी करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यावर लक्ष द्यावे. प्रादेशिक शांतता बिघडवणारी लष्करी कृती करु नये” असे ली यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment