कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिलेच्या जिद्दीचा प्रवास
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिलेच्या जिद्दीचा प्रवास
तुळजापूर ( प्रतिनिधी ) आरोग्यासाठी अनेकदा आपण भेसळयुक्त पदार्थ व मसाला टाळतो,रासायनिक वापरामुळे स्वास्थ्य बिघडत चालले आहे, त्यामुळे घरगुती अन अस्सल कुठे काही मिळत का ते सतत शोधत असतो,पण असाच एक प्रयोग तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथील सौ.सुवर्णा मल्लिनाथ वैद्य या महिलेने केला आहे,घरगुती पध्दतीने या दैनंदिन लागणाऱ्या चटणी,लोणचे व मसाले बनवण्याचा आपला लहान उद्योग सुरु केला आहे.आरळी बु सारख्या गावात एस.एम.व्ही. मसाले या नावाने नोंदणीकृत असा घरगुती उद्योग आज सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे,आसपासच्या आठ दहा गावातील नागरिक मोठया संख्येने या प्रोडक्टचा वापर करत आहेत. नॅचरल व घरगुती पध्दतीने ही प्रोडक्ट बनवली जात आहेत,यात लाल तिखट,काळ तिखट, हळद पावडर,शेंगा चटणी,गरम मसाले, जिरा पावडर,हळद पावडर,धने पावडर, ज्वारी व भाजरीची कडक भाकरी,आंबा लोणचं,लिंबुचे लोणचे, हिरव्या मिरचीचे लोणचे,कारल्याचे लोणचे,ओल्या हळदीचे लोणचे,महालंगी लिंबू लोणचे असे ना कलर ना केमिकल तसेच कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता हे सर्व घरगुती पद्धतीने बनवले जात आहे.ग्रामीण भागात आज शेतीला जोड व्यवसाय गरजेचा आहे,कुटुंब जगवायचे असेल तर सर्वांनी काहीतरी मदत केली पाहिजे याच उद्देशाने संपूर्ण कुटुंब या व्यवसायात सौ.सुवर्णा यांना मदत करत असल्याची माहिती मल्लिनाथ वैद्य यांनी दिली,या छोट्याशा उद्योगामुळे आज अर्थिक अडचणीवर मात करता येत आहे.तसेच या लघु उद्योगामुळे गरजू महिलांना कामही मिळत आहे. आसपासच्या अनेक खेड्यातील लोक हे प्रोडक्ट घेण्यासाठी येत असल्याने चांगल्या पद्धतीने यातून उदरनिर्वाह होतो आहे.
Comments
Post a Comment