पंढरपूर पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा


पंढरपूर पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा

तालुका हद्दीतील २० तर शहरातून २१ दुचाकी ताब्यात

पंढरपूर प्रतिनिधी:जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असून याचा फैलाव रोखण्यासाठी भारतात सरकारकडून जमावबंदी, संचारबंदी तसेच १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.याचा अंमल महाराष्ट्र सरकारकडून राबविला जात असून नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरु नये,घराबाहेर विनाकारण पडू नये यासाठी सरकार व पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतानाही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत.पंढरपूर तालुक्यातील नागरीकही मोठ्या प्रमाणात विविध कारणांनी पंढरपूरला येत असल्याने त्यांना अटकाव करण्यासाठी व रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना राबविल्या जात आहेत.याचाच एक भाग म्हणून काल अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यांवर फिरणाऱ्या ५२ दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.
            पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील तीनरस्ता परिसरात पंढरपूर तालुका पोलिसांनी तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी यंत्रणा राबवत काल तब्बल २० वाहनांवर कारवाई केली.यावेळी जे लोक सबळ कारणाशिवाय विनाकारण फिरत होते अशा लोकांच्या वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार कारवाई करत तब्बल २० दुचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली.तर १४००० रुपये दंड वसूल करत सदर दुचाकी वाहने मोटार वाहन कायदा कलम २०७ प्रमाणे कारवाई करत पोलीस ठाण्यात अटकावून ठेवण्यात आली आहेत.अशाच प्रकारची करवाई पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली करत २१ वाहने ताब्यात घेतली तर ११ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये अन्यथा आणखी कडक कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिला आहे.


"नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये,किरकोळ गोळ्या औषधे गावातूनच स्थानिक डॉक्टर किंवा मेडिकल मधून उपलब्ध करून घ्यावीत.आजारी रुग्णाला भेटण्याचे कारण सांगून कोणीही विनाकारण बाहेर पडून सर्वांचा जीव धोक्यात घालू नये.नागरिकांनी संचारबंदी पाळून घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे."
 
   किरण अवचर
पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब