..म्हणून खडसे, मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाही!
..म्हणून खडसे, मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाही!

Khadse-Munde
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यापैकी चार जागा निवडून आणण्याची संधी भाजपला आहे. चारही जागांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे चर्चेत होती. पंकजा मुंडे यांनी तर उमेदवारी अर्जाची तयारी केल्याचीही चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चौघांचाही पत्ता कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यावरून आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
पंकजा मुंडे व खडसे हे जनाधार असलेले नेते आहेत. त्यामुळं त्यांना पुन्हा डावलणं पक्षाला जड जाण्याची शक्यता आहे. मात्र, याचा विचार न करता भाजपनं धाडसी निर्णय घेतला आहे. पक्षानं ठरविलेल्या नव्या निकषांचा फटका त्यांना बसल्याचं बोललं जात आहे. या निकषांनुसार, विधानसभा वा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांचं मागच्या दारानं पुनर्वसन न करण्याचा भाजपचं धोरण आहे. खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे व पंकजा यांची बहीण प्रीतम मुंडे या दोघी सध्या लोकसभेत खासदार आहेत. कुटुंबातील एक सदस्य पदावर असताना पुन्हा त्याच कुटुंबातील व्यक्तीला संधी देण्यास पक्षश्रेष्ठींनी नकार दिला. त्यामुळं देखील त्यांची नावं मागे पडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपनं ठरविलेल्या उमेदवारीच्या नव्या निकषांमध्ये क्वचितच अपवाद केला जातो. गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत तो करण्यात आला आहे. पडळकर यांची इच्छा नसतानाही भाजपनं त्यांना बारामतीमधून विधानसभा निवडणुकीला उभं केलं होतं. त्याचवेळी त्यांना विधान परिषदेचं आश्वासनही देण्यात आलं होतं. विधानसभेत त्यांचा पराभव झाल्यानं त्यांना विधान परिषदेत घेण्याचा शब्द भाजपनं पाळला आहे.
Good
ReplyDelete